ट्रकचे चेचीस व इंजिन नंबर बदलून हेराफेरी होत असल्याचा भांडाफोड धुळे पोलिसांनी अलीकडेच केला होता. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल ३० ट्रक हस्तगत केले आहेत. या हेराफेरीतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याने धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा तपास करीत होते. यानंतर आता मुख्य सूत्रधाराला थेट नागपुरातून अटक करण्यात आली आहे.
या सूत्रधाराची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थेट नागपुरात धडक दिल्यानंतर तेथे हा आरोपी ट्रकची हेराफेरी करताना रंगेहात सापडला. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याशिवाय पोलिसांनी त्याच्याकडून काही महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले की, ट्रक हेराफेरीप्रकरणी समांतर तपास सुरू असताना धुळे एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की ट्रकचे चेचीस व इंजिन नंबर बदलून हेराफेरी करणारी टोळी आपण ताब्यात घेतली आहे. हे संशयित आरोपी अमरावती येथील रहिवासी असणाऱ्या युनूस खानकडून ट्रकचे चेचीस व इंजिन नंबर बदलून घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून धुळे एलसीबीने युनूस खानच्या शोधात अमरावती गाठली. मात्र, संशयित युनूस खान हा नागपूरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे एलसीबी नागपूर येथे सदर ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी युनूस खान एका कँटेनेरवर चेचीस नंबर पंच करीत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला सर्व हेराफेरीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी युनूस खानकडून २२ हजारांचे साहित्य आणि ५८ लाख रुपये किमतीचे तीन ट्रक जप्त केले आहेत. या घटनेचा पुढील तपास धुळे पोलीस करत आहेत.