शहरातील दहा तरूणांच्या टोळीने उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथे जाऊन गावठी पिस्तुलातून गोळीबार करून एका तरूणाला जबर जखमी केले. या टोळीच्या शोधासाठी बीड पोलिसांचे पथक शहरात आले असून, तिघांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार सुलेमान आदमाने हा फरार झाला आहे.
गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मंगेश बाबुराव पवार, राहूल गोविंद नानस्कर, परवेज अजीज कुरेशी (रा. सर्व श्रीरामपूर) यांना सोमवारी अटक केली. अद्याप इम्रान साजिद कुरेशी, अनिस कुरेशी, सलमान आदमाने व इतर चार जण फरार आहेत.
शहरातील दहा तरूण स्कॉर्पियो मोटारीतून सोमवारी उमापूर येथे शस्त्रास्त्रांसह गेले. नातेवाईकांबरोबर जमिनीचे वाद असलेल्या लोकांना ते भेटले. तेथे त्यांना दमबाजी केली. त्यांचे शकील खाजा कुरेशी याच्याशी भांडण झाले. ते भांडण लोकांनी मिटवले. नंतर रात्री आठच्या सुमारास हे सर्व जण शेवगाव रस्त्यावरील हॉटेलमध्ये बसले. यावेळी शकील कुरेशीदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये होता. तेथे पुन्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. सुलेमान आदमाने याने गावठी पिस्तुलमधून गोळीबार केला. ही गोळी मोमेन गुलाम कुरेशी (वय-२५, रा. उमापूर) याच्या डाव्या गुडघ्यात घुसली. चकलांबा पोलीस ठाण्यात शकील ख्वाजा कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुलेमान अदमाने, मंगेश पवार, परवेझ कुरेशी, इम्रान साजिद कुरेशी (सर्व रा. श्रीरामपूर), अनिस कुरेशी, रफिक रहमान कुरेशी, सोहेल रफिक कुरेशी (रा. उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याच प्रकरणी अजीज हानिफ कुरेशी (रा. श्रीरामपूर) यानेही फिर्याद दिली आहे. मित्राकडे ईदनिमित्त गेलो असता आमचे शकील कुरेशी याच्याबरोबर वाद झाले. त्यातून मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून मन्सूर उस्मान कुरेशी, फैय्याज मन्सर कुरेशी, सोहेब मन्सर कुरेशी, अजहर उमर कुरेशी, जावेद उस्मान कुरेशी, मोमिन गुलाम कुरेशी, सलिम उमर कुरेशी, अल्ताफ अली कुरेशी (सर्व रा. उमापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान चाकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एफ. प्रधान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी श्रीरामपूर येथे आदमाने याच्या घरी छापा टाकला, मात्र तो पसार झाला होता. राहुल नानुस्कर याच्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाला घटनेशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याने सोडून देण्यात आले. यापूर्वीही हाणामाऱ्या प्रकरणी सुलेमानविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्हेगारांचे वास्तव्य रेल्वे स्थानक परिसरात असते. हा परिसर गुन्हेगारांचा अड्डा आहे. बीड पोलिसांच्या कारवाईमुळे आता त्यावर प्रकाश पडला आहे. स्थानिक पोलिस अजूनही शांत आहेत.
मराठवाडय़ातील उमापूरमध्ये श्रीरामपूरच्या टोळीचा गोळीबार
शहरातील दहा तरूणांच्या टोळीने उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथे जाऊन गावठी पिस्तुलातून गोळीबार करून एका तरूणाला जबर जखमी केले.
First published on: 14-08-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest three gangster for firing in marathwada