सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका गारमेंट कारखान्यात मजूर म्हणून काम करणाऱ्या १२ बांगला तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात बेकायदा घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तींना पकडण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी २६ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर-पुणे महामार्गावरील चिंचोली एमआयडीसीमध्येही काम करणाऱ्या तीन बांगलादेशी व्यक्तींना पकडण्यात आले होते. त्यानंतर १५ जानेवारी रोजी बार्शी शहरात एका कुंटणखान्यामध्ये देहविक्रय व्यवसायासाठी बांगलादेशी तरुणींचा वापर केला जात असल्याचेही उजेडात आले असता बांगलादेशी चार महिला व दोन पुरुषांसह त्यांच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारे तीन स्थानिक व्यक्तींना अटक झाली होती.
या दोन घटनांनंतर इकडे सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्थेच्या कारखान्यात शिलाई काम करणारे १२ बांगलादेशी तरुण सापडले. मोहम्मद नजीरउल्ला इस्लाम (वय ३०, रा. कोदंमपल्ली, जि. भोगूर), नासीर सरकार मो. बदी उज्जमान (वय २२, रा. तैगोरिया, जि. नाटोर), मोहम्मद मिजानूर रहेमान (वय २६, रा. नेत्रकोना), बाबूमियां सुलतान (वय २५), इम्रान नूरआलम हुसेन (वय २७, दोघे रा. कोदंलपूर), मोहम्मद रसूल अमीन खलील फोराजी (वय ३३), अलाल नूरइस्लाम मियां (वय ३५), मोहम्मद अलीमीन हनीफ बेफिरी (वय २९, तिघे रा. उत्तर परगणा), मोहम्मद हजरतअली पोलाश (वय ३१, रा. काझी बारा, जि. बेगुरगा), मोहम्मद हजरतअली पोलाश (वय ३१, रा. नारहट्टा, जि. बेगुरगा), मोहम्मद सोहेल जावेदअली सरदार (वय २२) आणि शफिक रशीद मोंडल (वय ३१, दोघे रा. ढाका) अशी या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगला देशींची नावे आहेत. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती देताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी हे सर्व बांगलादेशी नागरिक गेले १५ दिवस ते ८ महिन्यांपासून अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये गारमेंट कारखान्यात काम करीत होते. या प्रत्येकाकडे बनवून घेतलेले स्वतःचे आधार कार्ड होते. त्यांना कोणी मदत केली ? त्यांचा सूत्रधार कोण आहे ? त्यांनी बांगलादेशातून भारतात कोणत्याही प्रकारचा वैध प्रवासी परवानगी आणि कागदपत्रे नसताना अशी घुसखोरी केली, यांचा तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय खोमणे हे करीत आहेत.