उसाला पहिली उचल तीन हजार रूपये मिळावी व गतहंगामातील उसाला ५०० रूपयांचा हफ्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. काल (रविवार) उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर संतप्त शेतकरू संघटनांनी आद (सोमवार) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा उशारा दिला होता. मात्र, या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच आंदोलन स्थळावरून सुमारे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना इंदापूरमधील एका सभागृहात ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या तीन जिल्ह्यातील कारखानदारांच्या बैठकीत उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान २ हजार ३०० रूपयांच्या पहिली उचलीवर शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोदवल्या आहेत.  
रविवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती, ऊसाची उपलब्धता, बँकेने दिलेली रक्कम आणि स्वाभिमानीची मागणी या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यात २३०० रूपये विनाकपात दर देणार असल्याचे जाहीर करत, संघटनेशी यावेळी चर्चा करण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader