कराड : कराड शहरातील शिंदे मळ्यात डॉ. राजेश शिंदे यांच्या बंगल्यावर गेल्या सहा दिवसांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीसांनी दोघांना जेरबंद केले. तर, या टोळीतील दरोडेखोरांचा शोध जारी असून, तेही लवकरच गजाआड होतील. त्यातून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल असा पोलिसांचा अंदाज आहे. डॉ. राजेश शिंदे हे आपल्या पत्नी पूजा व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बारा डबरी परिसरात होलीस्टींग हिलिंग सेंटर चालवतात. इथेच त्यांचा बंगला आहे. या बंगल्यावर रविवारी उत्तर रात्री सशस्त्र टोळीने दरोडा टाकला होता.
हेही वाचा >>> “काहीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा थेट विरोध
या दरोड्यात डॉ.शिंदे व त्यांच्या वृध्द आई, सासू तसेच पत्नी, मुले, बहीण अशा कुटुंबीयांना चाकू व सुऱ्यांचा धाक दाखवून सुमारे ४८ तोळे सोन्याचे दागिने व २७ लाखांची रोख रक्कम असा तब्बल ४६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. यानंतर ही टोळी मोटारकारने पाटणबाजूने पुढे मुंबईकडे गेल्याची माहिती समोर आली. पण चार – पाच दिवस उलटलेतरी गुन्हेगार हाती लागत नसल्याने पोलिसांवर टीका होत होती. या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.
हेही वाचा >>> “अजित पवार गट नक्की अपात्र होणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचं थेट विधान
दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांची पाच पथके विविध ठिकाणी धाडण्यात आली होती. पोलीस रात्रीचा दिवस करुन दरोडेखोरांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी कसून केलेल्या तपासाला यश आले. या गुन्ह्यात अंबरनाथ येथे सापळा रचून एकाला पकडले गेले. कुलदीपसिंग असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आणखी एकाला ताब्यात घेतल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. पण त्याचे नाव समजू शकले नाही.