नवजीवन योजनेच्या माध्यमातून कुटुंबाच्या भेटी घेत नक्षलवाद्यांवर दबाव वाढवण्याच्या गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांना आता यश मिळू लागले आहे. पोलीस अधिकारीच घरी जायला लागल्याने चळवळीत सक्रिय असलेले अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या तयारीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांसाठी आतापर्यंत शासनाची आत्मसमर्पण योजना कार्यरत होती. आता या योजनेचे स्वरूप आणखी आकर्षक करण्याचा गृह खात्याचा प्रस्ताव आहे. या योजनेचा लाभ नक्षलवाद्यांनी घ्यावा यासाठी पोलीस दलाच्या पातळीवर आजवर फारसे प्रयत्न केले जात नव्हते. आता पोलिसांनी या योजनेला आणखी बळ देण्यासाठी स्थानिक पातळीवर नवजीवन योजनेचा शुभारंभ नुकताच केला आहे. गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम व पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या योजनेच्या माध्यमातून चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या थेट घरी जायला अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.
या योजनेचा शुभारंभ करण्याच्या आधी पोलिसांनी गडचिरोली जिल्हय़ातील रहिवासी असलेल्या सुमारे २५० नक्षलवाद्यांची एक यादी तयार केली. या यादीत असलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याच्या घरी जाण्याचा निर्णय आता अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ही योजना वर्षभर चालणार असली तरी एक विशेष मोहीम म्हणून १ ते ७ एप्रिलदरम्यान सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नक्षलवाद्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घ्यायची, असे ठरवण्यात आले.
चळवळीत मोठय़ा पदावर असलेल्या नक्षलवाद्याच्या घरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर साधा सदस्य असलेल्या नक्षलवाद्याच्या घरी कनिष्ठ अधिकाऱ्याने जायचे असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार गेल्या पाच दिवसांत गडचिरोली जिल्हय़ातील पोलीस अधिकाऱ्यांनी ७५ नक्षलवाद्यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबाच्या भेटी घेतल्या. ७ एप्रिलनंतर या योजनेचा दुसरा टप्पासुद्धा जाहीर केला जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नक्षलवाद्यांची गावे दुर्गम भागात आहेत. अनेक गावात तर जायला रस्ता नाही. नक्षलवाद्यांच्या घरी जावून त्याच्या कुटुंबाला भेटणे तसे जोखमीचे काम आहे, याची जाणीव असूनसुद्धा वरिष्ठांपासून ठाण्यात काम करणारे अधिकारीसुद्धा रस्ते पायी तुडवत नक्षलवाद्यांच्या कुटुंबांना भेटले. या भेटींना प्रसिद्धीसुद्धा मिळाली. त्याचा फायदा आता दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस अधिकारी भेटून गेल्यानंतर अनेक कुटुंबांनी चळवळीत असलेल्या नक्षलवाद्यांशी संपर्क साधला. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस घरी आले, चांगले बोलले, समर्पण केले तर अनेक योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी आश्वासने दिली. त्यामुळे आता चळवळीत कशाला राहता, असा सवाल या कुटुंबांनी करणे सुरू केल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळातसुद्धा दबाव वाढला आहे. कुटुंबांच्या या विनंतीला चार ते पाच प्रकरणात प्रतिसाद मिळाला असून लवकरच काही नक्षलवादी समर्पण करतील, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या चळवळीचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये प्रथमच अशा प्रकारची योजना गडचिरोलीत राबवली जात आहे. त्याला यश मिळाले तर ही योजना रोलमॉडेल म्हणून नावारूपाला येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा