सहा वर्षांपूर्वी यवतमाळमधील अवधुतवाडी पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज (मंगळवार) यवतमाळ येथे दाखल झाले आहेत.
२०१५ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात अवधूतवाडी पोलिसांनी विजय घुटके याला अटक केली होती. कारागृहातून बाहेर आल्यावर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत विजयचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे तक्रार केली. याच तक्रारीवरून आयोगाने चौकशी समिती गठीत केली. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
त्याचाच आढावा आज उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घेतला. विजय घुटके याचा मृत्यू झाला त्या कालावधीत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांना आज उपमहानिरीक्षकांनी चौकशीसाठी पाचारण केले. प्रत्येकाची वैयक्तिक हजेरी घेत जबाब नोंदविण्यात आले. दुपारपासून सुरू झालेली जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.