सोलापूर : शालेय पोषण आहार योजनेतून मिळणारा सामान्य विद्यार्थ्यांच्या तोंडातील अन्नाचा घास काढून घेण्याचा प्रकार सोलापुरात एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या शाळेत घडला असून याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका आणि अन्य एकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी विडी घरकुलातील राजर्षी शाहू प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणा-या मराठा समाजसेवा मंडळामार्फत ही शाळा चालविली जाते. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे आहेत. त्यांच्या विरोधात यापूर्वी एका मागासवर्गीय व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा प्रलंबित असून त्याशिवाय लैंगिक शोषणाचा गंभीर गुन्हाही दाखल झाला होता.
हेही वाचा…विद्यार्थ्यांना गृहपाठ नको; राज्यपाल रमेश बैस यांचे मत
राजर्षी शाहू प्राथमिक शाळेतून शालेय पोषण आहार योजनेतून उपलब्ध झालेला धान्यमाल काळ्या बाजारात विक्रीसाठी एका वाहनात भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्याची माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयास दिली. अन्नधान्य वितरण अधिका-यांची यंत्रणा तेथे लगेचच धावून आली. तांदूळ, मटकी डाळ, मूगडाळ भरलेली पोती आणि खाद्य तेलाची २५ पाकिटे असे शासकीय अन्नधान्य तीन चाकी वाहनातून भरून नेले जात असल्याचे दिसून आले.
हेही वाचा…थेट मोदींच्या विरोधात वाराणसीत मराठा उमेदवार उभे करणार, माढ्यात दीड हजार उमेदवार अर्ज भरणार
हे संपूर्ण अन्नधान्य ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यात शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापुरे यांनी दिलेल्या जबाबानुसार संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या आदेशाप्रमाणे हे अन्नधान्य सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत सोहेल कलबुर्गी नावाच्या व्यापा-याकडे विक्रीसाठी नेला जात होता, अशी माहिती निष्पन्न झाली. त्यानुसार सपाटे व मुख्याध्यापिका सोलापुरे आणि सोहेल कलबुर्गी यांच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात जीवनाश्यक वस्तू अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.