रत्नागिरी/राजापूर : राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात शुक्रवारी मोर्चा काढू पाहणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही आंदोलक जखमी झाले असून, त्यातील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर आंदोलन तीन दिवस स्थगित करण्याची घोषणा प्रकल्पविरोधी नेत्यांनी केली.
बारसू परिसरात मंगळवारपासून प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम सुरू झाले. त्या दिवशी तंत्रज्ञांच्या गाडय़ा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वातावरण निवळले. पण, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष होता. त्यामुळे ते दररोज येथील सडय़ावर एकत्र जमत होते. त्यातून शुक्रवारी आंदोलकांनी ड्रिलिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. अशा घटनेची शक्यता गृहित धरून या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच सुमारे दोन हजार पोलीस आणि राज्य राखीव बलाचा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला. सर्व गावांची नाकेबंदी केली आहे. तसेच माळरानावरही दगड आणि झाडाच्या मोठय़ा फांद्या आडव्या टाकून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यांना ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी प्रयत्न सुरू केला. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
हा जमाव पाहून पोलीस पुढे सरसावले. त्यांनी आधी हातांनी ढकलून आंदोलकांना मागे हटवण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलक त्यांना झुगारून पुढे घुसत असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसेच पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. या झटापटीत काही आंदोलक अडकून पडल्याने, तर काहीजण लाठीचा मार बसल्याने जखमी झाले. त्यापैकी तिघांना जास्त दुखापत झाली. जखमी आंदोलकांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही आंदोलक बारसूच्या सडय़ावरुन हलायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रत्नागिरीला रवाना केले.
दरम्यान, पुढील तीन दिवस हे आंदोलन स्थगित राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने काशीनाथ गोरले यांनी जाहीर केले. मात्र, या काळात काम बंद झाले नाही किंवा योग्य प्रकारे चर्चा केली नाही, तर आंदोलन पुन्हा सुरू होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चेस सदैव तयार
या विषयावर जिल्हा प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चा करायला सदैव तयार आहे. ग्रामस्थांनी सकारात्मक चर्चेसाठी, सनदशीर मार्गाने सर्वाच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सुमारे ५०० ते ६०० जणांच्या जमावाने सर्वेक्षणाच्या ठिकाणी येऊन काम बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परिस्थिती कौशल्याने हाताळून नियंत्रणात आणली, असे प्रशासनाने म्हटले असून शुक्रवापर्यंत ५ ठिकाणी ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले असल्याचेही नमूद केले आहे.
आंदोलकांचे रक्त सांडण्याचे पाप सरकारने केले : राऊत
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना शुक्रवारी सकाळी बारसू परिसरातून पोलिसांनी अटक केली. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर आंदोलनाबाबत राऊत म्हणाले की, ‘‘बारसूच्या भूमीवर आंदोलनकर्त्यांचे रक्त सांडण्याचे पाप शिंदे सरकारने केले आहे. लाठीमार, अश्रुधूर, बेशुद्ध झालेले आंदोलक हा सर्व प्रकार संपूर्ण देशाने पाहिला आहे. तरीही लाठीमार झालाच नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. काहीच अनुचित प्रकार घडला नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत सांगतात. असे निर्दयी मंत्री महाराष्ट्राला लाभणे हे दुर्दैव आहे’’.