सांगली : रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने दूरध्वनीवरुन दिल्याने सांगली व मिरज स्थानकावर पोलीसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत जागता पहारा ठेवण्यात आला. पाच व्यक्ती असून आरडीएक्सने रेल्वे स्टेशन व परिसरात बॉम्ब स्फोट घडविण्यात येणार असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. यामुळे सतर्क पोलीसांचा गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरुध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाणेचे दुरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०३३ यावर एका अनोळखी व्यक्तीने त्याचेकडील फोनवरुन फोन करुन तो दहशतवादी आहे. त्याच्यासोबत ५ व्यक्ती असुन त्यांच्याजवळील आरडीएक्सने ते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवुन रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविणार असुन मुंबई, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, पुणे या ठिकाणी सुध्दा त्यांची माणसे पोहचली असुन तेथे देखील बॉम्बस्फोट करणार आहोत असे भाष्य केले. सदरची बाब अतिशय गंभीर असल्याने त्याबाबत तात्काळ स्टेशन डायरीस नोंद घेवुन वरीष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या अनुषंगाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणुन मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वतः व सांगली रेल्वे स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली. सदर धमकीच्या कॉलच्या संदर्भाने सांगली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणेस नियंत्रण कक्षामार्फत संदेश देवुन मुख्य हमरस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची कसुन झडती घेण्यात आली.
हेही वाचा >>> VIDEO : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव, म्हणाला…
जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणेस आपतकालीन परिस्थीतीसाठी सज्ज राहणेच्या सुचना देण्यात आल्या. तसेच सरकारी व खाजगी दवाखान्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तु मिळुन आलेली नाही.
या तपासणी व शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज, प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभाग, कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगल विरोधी पथक, दहशतवाद विरोधी पथक व शाखा, वाहतुक शाखा, रेल्वे पोलीस पथक असे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हजर होते. सांगली व मिरज रेल्वे स्टेशन तसेच जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवणेत आलेला आहे. धमकी देणाऱ्या अनोळखी इसमाविरुध्द सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. सदर इसमाचा शोध सुरु आहे. सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, कोणतीही संशयित वस्तु अथवा इसम आढळुन आल्यास त्याबाबत तात्काळ नजिकच्या पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क करुन त्याबाबत माहिती द्यावी. जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य अशी सर्व खबरदारी घेत असुन कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन सांगली पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.