इचलकरंजी येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबलला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. आझाद अब्दुलरहिमान गडकरी (वय ३४, मूळ गाव पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील चौकात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हातकणंगले येथील रफिक शमशुद्दीन मुल्ला (वय ३८) यांचे कबनूर येथे रिक्षा रिपेअरीचे गॅरेज आहे. मुल्ला यांच्या विद्यार्थी व कामगार वाहतूक करण्यासाठी दोन व्हॅन आहेत. सदरच्या व्हॅनवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी प्रतिमहा हप्ता द्यावा अशी मागणी गडकरी याने मुल्ला यांच्याकडे केली होती. त्यानुसार दरमहा तीनशे रुपये प्रमाणे नऊ महिन्यांचे २७०० रुपये होतात. त्यामध्ये ७०० रुपयांची सूट देऊन दोन हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली होती. मुल्ला यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काल (बुधवारी) केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी दुपारी कबनूर येथे मुल्ला यांच्या गॅरेजनजीक सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे गडकरी हा गॅरेजमध्ये आला व त्याने मुल्ला यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचक्षणी पोलिसांनी गडकरी याला रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम या बुरखा घालून घटनास्थळी मुल्ला यांच्यासोबत होत्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पद्मा कदम, उदयसिंह पाटील, मनोज खोत, संजय गुरव यांच्या पथकाने केली. महिन्याभरात दोन पोलीस लाच घेताना जाळय़ात सापडले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा