थेरोंडा वाळीत प्रकरणातील फरार झालेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमवारी या प्रकरणातील सहा आरोपींपकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना अलिबागच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वाना मंगळवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका गटाच्या पराभवास जबाबदार ठरवून त्या गटाला मतदान केले नाही या संशयाने, थेरोंडा गावकीच्या या ६ पंचांनी धनंजय एकनाथ कोंडे, संतोष एकनाथ कोंडे व अंगद अशोक पाटील यांना वाळीत टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही आणि ठेवल्यास ५००० रु. दंड भरावा लागेल, अशी धमकी दिली असल्याने या तिघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या १९ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये शरद रामचंद्र पाटील, नरेंद्र पांडुरंग कोंडे, उमेश रामचंद्र कोंडे, नंदकुमार नारायण नंदन, हेमंत जगन्नाथ चायनाखवा आणि समाजातून बहिष्कृत केल्याबाबत घरोघरी निरोप पोहोचविणारा दत्तात्रेय पांडुरंग मेस्त्री यांचा समावेश होता. या सर्वावर भा.दं.वि. कलम ३८४, ३८५, १५३अ, १२०ब, ११७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते. गेल्या १३ नोव्हेंबरला या प्रकरणातील प्रमुख आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबागच्या न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर नंदकुमार नंदन वगळता पाच आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली.
वाळीत प्रकरणातील पाच आरोपींना पोलीस कोठडी
थेरोंडा वाळीत प्रकरणातील फरार झालेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर
First published on: 20-11-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody of the 5 accused in ostracize case