अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पतीची हत्या घडवून आणणा-या हेमा जितेंद्र भाटिया आणि मारेकरी तथा तिच्या  प्रियकराला पिस्तूल पुरवणारा विक्रम ऊर्फ गोटय़ा किशोर बेरड (राहणार सिध्दार्थनगर) या दोघांना न्यायालयाने येत्या दि. ९ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच बेरड याला पिस्तूल पुरवणा-या आणखी दोघांनाही न्यायालयाने दि. ८ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
शहरातील व्यापारी जितेंद्र भाटिया यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी हेमा हीच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी तिला व बेरड यालाही अटक केली. त्यांना दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गायकवाड यांच्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांना येत्या दि. ९ पर्यंत पोलिस कोठडीत टेवण्याचा आदेश दिला. या सुनावणीत सरकारच्या वतीने सचिन सूर्यवंशी व आरोपींच्या वतीने महेश तवले आणि संजय दुशिंग यांनी काम पाहिले.
दरम्यान, बेरड याला सोनवणे व सपाटे या दोघांनी गावठी पिस्तूल दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तोफखाना पोलिसांनी या दोघांनाही अटक करून सोमवारीच मुख्य न्यायदंडाधिकारी राजकारणे यांच्या न्यायालयात हजर केले असता या दोघांना न्यायालयाने दि. ८ पर्यंत पोलिस कोठडी दिली. भाटियांचा मारेकरी तथा मुख्य आरोपी त्यांची पत्नी हेमा हिचा प्रियकर प्रदीप जनार्दन कोकाटे याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली असून त्याला येत्या दि. ७ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा