अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह चौघा जणांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली असून, या तिघा जणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवेढा येथे घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सिद्धण्णा धोंडप्पा कोटे (४५) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कमलाबाई (३५) व तिचा प्रियकर दीपक मेटकरी आणि या दोघांना गुन्हय़ात मदत करणारे बिरप्पा जक्कवडरे व रामचंद्र पेटर्गे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात मृत सिद्धण्णा कोटे यांचे बंधू रायगोंडा कोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सिद्धण्णाची पत्नी कमलाबाई हिचे दीपक मेटकरी या तरुणाबरोबर अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. परंतु या अनैतिक संबंधात पती सिद्धण्णा हा अडसर ठरत होता. त्यामुळे कमलाबाई व दीपक यांनी त्याचा खून करण्याचा डाव रचला. यात त्यांनी बिरप्पा जक्कवडरे व रामचंद्र पेटर्गे यांची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार सिद्धण्णा याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून कमलाबाई व प्रियकर दीपक मेटकरी यांनी खून केला. नंतर मित्राच्या मदतीने मृतदेह गावालगत नागप्पा जक्कवडरे यांच्या शेतात नेऊन टाकला.
दरम्यान, मंगळवेढा पोलिसांनी या गुन्हय़ाची उकल करण्यासाठी श्वानपथकाची मदत घेतली असता श्वानपथक घटनास्थळापासून गावच्या वेशीपर्यंत जाऊन घुटमळत राहिले. त्यामुळे मारेकरी याच परिसरातील असल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने हा गुन्हा अखेर उघडकीस आणला.

Story img Loader