जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांचे पद रद्द करण्यासाठी बजावलेली नोटीस मागे घेण्याकरिता तब्बल ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेलेले येथील विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांची न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. मागील गुरुवारी भालेराव यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर ते तीन दिवस प्रकृतीचे कारण दाखवून संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. बँकेबाबत आलेल्या काही तक्रारींची भालेराव चौकशी करत होते. बँकेच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढीचा विषय होता. त्यातच, सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या तीन संचालकांना अपात्र ठरविण्याबाबतचे पत्र पाठविले. त्यात संचालक प्रशांत हिरे, देवीदास पिंगळे आणि यशवंत भोये हे तिघे थकबाकीदार असल्याने सहकार कायद्यानुसार त्यांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. या घडामोडीत प्रशांत हिरे यांचे संचालकपद कायम राखण्यासाठी सहा लाख आणि तक्रारदार अद्वय हिरे यांचे बँकेच्या अध्यक्षपदाला मुदतवाढीला अनुकूल ठरेल असा अहवाल देण्यासाठी पाच लाख याप्रमाणे ११ लाख रुपये देण्याची मागणी भालेराव यांनी केली.
गुरुवारी रात्री भालेराव यांच्या निवासस्थानी ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतली. त्या वेळी प्रकृती बिघडल्याचे कारण दाखवून ते रुग्णालयात दाखल झाले. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तीन दिवस कोणतीही कार्यवाही करता आली नाही. सोमवारी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.