पारनेर पारनेर तालुक्यातील नागापूरवाडी येथील नदीपात्रातून बेकायदेशीरपणे ३ कोटी ४० लाख रूपयांच्या वाळूचोरी प्रकरणी पारनेर पोलिसांनी भाळवणी येथील वाळूतस्कर संदीप कपाळे याच्यासह तीन जणांना मंगळवारी सकाळी अटक केली. त्यांना पारनेर न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने मातब्बरांनाच कारवाईचा दणका दिल्याने वाळुतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
निवासी जिल्हाधिकारी सदानंद जाधव, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार डॉ. विनोद आमरे यांच्या पथकाने दि. १ मे रोजी दुपारी नागापूरवाडी येथेच पुन्हा दोन पोकलेन व एक डंपर पकडले होते. याप्रकणी पारनेर पोलिस ठाण्यात मंडलाधिकारी सुशीला अशोक मोरे यांनी फिर्याद दिली असून भाळवणी येथील प्रतिष्ठीत वाळुतस्कर संदीप कपाळे व पारनेरचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन अडसूळ, दोन पोकलेनचे चालक व नंबर नसलेल्या डंपरचालकाने पर्यावरण कायद्याचा भंग करून नदीपात्रातून ३ कोटी ४० लाख रूपयांची सुमारे ६ हजार ८१३ ब्रास वाळू चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी दोन पोकलेन व एक डंपर जप्त करण्यात आले आहे. पारनेर पोलिसांनी भाळवणी येथील बब्लू उर्फ अशोक रोहोकले याला दोन दिवसांपूर्वीच अटक केली होती. मातब्बरांना अटक केल्याने इतर वाळुतस्करांचे धाबे दणालले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद जांभळे करीत आहेत.