लोकसत्ता वार्ताहर

जालना : गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दोन मालवाहू वाहने, एक मोटार सायकल इत्यादी २९ लाख ३५ हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सिध्देश्वर फाट्याजवळ गोरावरी नदीपात्रात कांही जण अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिस पथकाने वेषांतर करून सकाळी सहा वाजता वाळू उपसा करणारांना वाहनासह पकडले. वाहन चालक, वाल मालक आणि सहाय्य करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गोंदी पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहूल राजू राठोड, संतोष ज्ञानेश्वर भूमकर, विलास कल्याण चौरे, मनोज तुळशीराम वैद्य आणि मनोज अशोक राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाव्य वाहनमालक किशोर आसाराम राठोड (मंठा) याच्या विरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात महसूल विभागाच्या पथकाने अंबड ताक्यातील वडीगोद्री ते पाथरवाला खुर्द गावांच्या रस्त्यावर अवैध वाळूने भरलेले वाहन पाठलाग करून पकडले. वाळू वाहतूक करणारांना लक्षात येऊ नये म्हणून हे पथक दुसऱ्या मालवाहू वाहनातून तेथे पोहोचले होते.

आणखी एका घटनेत अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या नायब तहसीलदारांस मंठा तालुक्यात मारहाण करण्यात आली. नायब तह‌सीलदार संजय शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना दहीफळ खेदारे गावाजवळ अवैध मुरुमांची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले. थांबविण्यासाठी प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने मुरूम टाकून पळ काढला. त्याचा पाठलाग करताना शिंदे यांना उत्खननासाठी वापरला जाणारी जेसीबी आढळून आली. मुरुम भरुन दिल्याबाबत जेसीबी चालकाकडे शिंदे विचारणा करीत असतानाच तेथे एका चारचाकी वाहनातून काही जण पोहोचले. चारचाकी वाहनतून आलेले संभाजी खेदारे आणि अन्य दोघांविरुध्द नायब तहसीलदार शिंदे यांना मारहाण करणे तसेच शासकीय कामात अड‌थळा आणल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. खंदारे याच्यासह ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकाविरुद्ध मंठा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा विषय विधीमंडळ अधिवेशनातही उपस्थित झाला होता. अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्याकरिता गेलेल्या महिला तहसीलदारास परतूर तालुक्यात धक्काबुक्की होण्याची घटनाही मार्चच्या पूर्वर्धात झाली होती. काही दिवसांपूर्वी अंबड येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी अवैध वाहूच्या संदर्भात दहा जणांना जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. मागील वर्षभरात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी नियुक्त पथ‌कारील १६ महसूल कर्मचाऱ्यांवर जिल्हयात हल्ले झाले आहेत. उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार आणि नायब तहसीलदारांबर हल्ले झाले आहेत. जालना जिल्हा तलाठी संघाने ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून पथकांना संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे.