संगमनेर : काल, रविवारी रात्री अज्ञात नराधमाकडून सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.शहरातील ज्ञानमाता विद्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यावेळी हा घृणास्पद प्रकार घडला. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
रविवारी रात्री संगमनेरमधील ज्ञानमाता विद्यालयाच्या प्रांगणात एक विवाह सोहळा सुरु होता. या सोहळ्यासाठी अकोले तालुक्यातील एक दांपत्य आपल्या सात वर्षांच्या मुलीसह उपस्थित होते.
मोठय़ा गर्दीत विवाह सोहळा सुरु असताना मुलीचे आईवडीलदेखील या सोहळ्यात गुंग होते. त्याचवेळी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने कोणालाही थांगपत्ता लागू न देता विवाहसोहळ्यातून या सात वर्षांच्या मुलीला विद्यालयाच्या प्रांगणात निर्मनुष्य ठिकाणी नेत तेथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक अभय परमार, सहाय्यक निरीक्षक गोपाल उंबरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड, पोलीस कर्मचारी अमित महाजन, शिवाजी डमाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत नराधम तेथून फरार होण्यात यशस्वी झाला होता.