धुळे शहरातील चैनीरोडवरील मच्छीबाजार, माधवपुरा भागात रविवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले. दगडफेक, जाळपोळ, हाणामारी करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. दंगलीनंतर परिसरात संचारबंदी लावण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दंगलीचे कारण अधिकृतपणे दिले नसले तरी, लहान मुलांच्या खेळण्यावर झालेल्या वादातून दोन गटांत ही दंगल उसळल्याचे बोलले जात आहे. हा वाद पेटल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगड-विटांसोबत अॅसिड आणि पेट्रोलच्या जळत्या बोळ्यांचा मारा करण्यात आला. या वेळी अनेक घरे व दुकाने पेटवून देण्यात आली, तर पाच-सहा मोटारसायकलींनाही दंगेखोरांनी लक्ष्य केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या वाहनांवरही मोठय़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मात्र, त्यानंतरही हिंसाचार थांबत नसल्याचे पाहून सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास महसूल विभागाने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. दंगल व गोळीबारादरम्यान २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले. त्यापैकी आशिक महंमद (३५), महंमद पटेल (१८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मृताचे नाव समजू शकले नाही. जखमींमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी मोनिका राऊत आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरा मच्छीबाजार माधवपुरा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगलीचे लोण शहरातील इतर भागांत पसरू नये यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा