‘‘कोकणात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांवर सुपारी घेऊन पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांची काळी यादी तयार करण्यात आली असून, राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊ,’’ असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला. नारायण राणे संपले आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
कणकवली येथे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सावंतवाडीचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना १५ ते ३० पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी झोडपून काढले होते. गोवा बांबुळीत त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची विचारपूस करण्यास उद्धव ठाकरे आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नारायण राणे आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर टीका केली. ‘तुम्ही घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे,’ असा धीर त्यांनी शिवसैनिकांना दिला.
पोलिसांना स्वत:चे नोकर असल्यासारखे वापरून घेण्यात आले आहे. मी सर्व पोलिसांना दोष देत नाही, पण पोलीस अधीक्षकांनी सुपारी घेतल्यासारखे वर्तन केले आहे. अशा सुपाऱ्या घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. महिला व पत्रकारांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला हे निंदनीय आहे. आम्ही जिंकणार आहोत, त्यावेळी सुपारी घेणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही, असे ठाकरे म्हणाले. रूपेश राऊळ यांना उपचारासाठी गोवा येथे आणावे लागत आहे. यावरून सिंधुदुर्गाचा विकास मीच केला, असे सांगणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. नारायण राणे यांनी आमने-सामनेचे आव्हान दिले आहे, असे विचारले असता, ‘कोण नारायण राणे, तो संपला आहे. सोनिया गांधी या जर वैचारिक वादविवाद करण्यास येत असतील, तरच मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, आ. सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, शैलेश परब आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा