गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तब्बल १३ वेळा गंभीर स्वरूपाच्या धमक्या आल्या असून वेळोवेळी पारनेर पोलिसांत तक्रार दाखल करूनही केवळ दोघा अरोपींनाच पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, तर कॅनडा स्थित गगन विधू याने माफ़ीनामा सादर केला आहे.
१ डिसेंबर रोजी अज्ञात ठिकाणाहून एका व्यक्तीने पत्र पाठवून शरद पवार यांचे समर्थन करीत हजारे यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. या पत्राची हजारे किंवा त्यांच्या समर्थकांनी फ़ारशी गंभीर दखल घेतली नाही, त्याबाबत पोलिसांतही तक्रार करण्यात आली नाही. २० ऑगस्ट २०१३ रोजी अज्ञात ठिकाणाहून अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून लष्करी राजवटीची मागणी करा अन्यथा तुमचा दाभोळकर करू असे नमूद करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या पत्राबाबत पोलिसांत तक्रार करूनही तपास लागू शकला नाही. १० सप्टेबर २०१३ रोजी वैजापूर येथून जनलोकपाल नावाने आलेल्या पत्रात आमदारांच्या पेन्शनवाढीविरोधात जनहित याचिका दाखल करा अन्यथा १५ दिवसांच्या आत तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी देण्यात आली. या तक्रारींचा तपास लावण्यातही पोलिसांना अपयश आले.
दि. ९ एप्रिल व १४ एप्रिल २०१४ रोजी ९५२७६९५३९७ या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे समर्थन करीत हजारे यांना शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी भीमराव माणिक या आरोपीस उस्मानाबाद जिल्हयातून जेरबंद केले. दारूच्या नशेत त्याने हे उद्योग केल्याची त्याने कबुली दिली. त्यासंदर्भात पारनेर न्यायालयात खटला सुरू आहे. २९ एप्रिल २०१४ रोजी उस्मानाबाद येथून जीवनराव गोरे याने डॉ. पद्मसिंह पाटील हे निवडणूक हारले तर तुमचा पवनराजे निंबाळकर करू अशी धमकी असलेले पत्र आले. या प्रकरणाचाही तपास प्रलंबित आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०१५ रोजी कॅनडा येथून गगन विधू या हजारे यांच्या पूर्वाश्रमीच्या अनुयायाने अरिवद केजरीवाल यांना स्टेजवर का घेतले, असे सांगून जिवे मारण्याची धमकी फेसबुकवरून दोनदा दिली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर विधू याने आपणास या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे सांगत माफ़ीनामा सादर केला. दि. २५ जून २०१५ रोजी बजरंग वस्ती राहता येथून संजय रा. घोलप या नावाने भाजपा सरकारला व भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध करू नये अन्यथा जीवे मारू अशी धमकी आली. तक्रारीनंतर पोलिसांनी राहता येथे जाउन संजय घोलप या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र ही व्यक्ती प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या नावाने तिसऱ्याच व्यक्तीने हे पत्र पाठविल्याचे निष्पन्न झाले.
१ जुलै २०१५ रोजी नेवासे येथील अंबादास लष्करे याने ३० हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती. या आरोपीचाही अद्याप शोध नाही. ७ ऑगस्ट २०१५ रोजी अज्ञात व्यक्तीने अज्ञात ठिकाणाहन पत्र पाठवून धमकी देणारे पत्र आले. मात्र नेहमीप्रमाणे या आरोपीचा शोधही लागला नाही. त्याच महिन्यात २० ऑगस्ट २०१५ रोजी उस्मानाबाद येथून महादेव पांचाळ याने शार्प शूटरला सुपारी देउन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुनिल सुरकेहा आरोपी जेरबंद करण्यात आला.
दि. २३ सप्टेबर २०१५ रोजी नेवासा येथून अंबादास लष्करे या नावाने पुन्हा धमकी देणारे पत्र आले. १ कोटी रूपयांना जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे असे नमूद करून शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दिल्लीतील आंदोलनाचे वृत्त निराधार
येत्या ३० जानेवारी रोजी दिल्लीस जाण्याचे किंवा आंदोलनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कोणतेही नियोजन नसून हजारे हे ३० जानेवारी रोजी आंदोलन करणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचा खुलासा हजारे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा