गृहमंत्रालयात सहा महिने फाइल पडून
निवृत्त होण्यापूर्वी बढती व्हावी, असे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे स्वप्न असते. मात्र, गृहमंत्रालयाने राज्यातील १२४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बढत्यांची फाईल गेली सहा महिने अडून राहिल्याने यापैकी अनेक अधिकाऱ्यांचे निवृत्तीपूर्वी साहाय्यक आयुक्तपदी बढती होण्याचे स्वप्न अपुरेच राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अशा २७ जणांना बढतीविनाच निवृत्त व्हावे लागले आहे.
राज्यात नोव्हेंबर २०११ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची शेवटची बढती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत बढती झालेल्या नाहीत. राज्य शासनाने नोव्हेंबर २०१२ मध्ये १२४ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्याची फाईल तयार केली आहे. त्यानुसार त्या पोलीस निरीक्षकांना त्यांना कोणत्या ठिकाणी नियुक्ती हवी आहे, याची माहिती मागविली होती. त्यानुसार त्यांनी अभिप्रायही पाठविले. त्यानंतर साधारण एका महिन्यात त्यांची बढती होणे अपेक्षित होते. पण ही फाईल गृहमंत्रालयात गेल्या सहा महिन्यांपासून पडून असल्याने हे अधिकारी सहायक पोलीस आयुक्त होण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. दरम्यानच्या काळात यातील २७ पोलीस निरीक्षक निवृत्तही झाले. तर काही पोलीस निरीक्षकांच्या निवृत्तीला काही महिनेच उरले आहेत. मात्र, साहाय्यक आयुक्तांच्या अनेक जागा रिक्त असतानाही फाईल पडून असल्याने पोलीस निरीक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी फेब्रुवारी महिन्यात या बढतींबाबत गृहखात्याशी पत्रव्यवहार करून पोलीस निरीक्षकांच्या बढतींची फाईल मंजूर करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतरही अजून फाईल मंजूर झालेली नाही. या फाईलमध्ये नाव असलेले आणि निवृत्तीस काही महिने शिल्लक राहिलेल्या पोलीस निरीक्षकांनी थेट गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. पण, त्याचा अद्यापपर्यंत काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी बढतीमध्ये लक्ष घालून तत्काळ ही फाईल मंजूर करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षकांनी केली आहे.
पुण्यात सात पदे रिक्त
राज्याप्रमाणेच पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. त्यामधील तीन पदे ही वाहतूक शाखेतील आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सहायक पोलीस आयुक्तांचे काम पोलीस निरीक्षकच पाहात आहेत. बढतीच्या यादीत पुण्यातील पोलीस निरीक्षकही प्रतीक्षेत आहेत.
निवृत्तीपूर्वी बढतीचे अनेक पोलीस निरीक्षकांचे स्वप्न अपुरेच!
गृहमंत्रालयात सहा महिने फाइल पडून निवृत्त होण्यापूर्वी बढती व्हावी, असे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे स्वप्न असते. मात्र, गृहमंत्रालयाने राज्यातील १२४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बढत्यांची फाईल गेली सहा महिने अडून राहिल्याने यापैकी अनेक अधिकाऱ्यांचे निवृत्तीपूर्वी साहाय्यक
आणखी वाचा
First published on: 19-05-2013 at 02:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspectors dreams for getting pramotion before retirement it remains only dream