नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यात तरबेज असलेल्या ‘सी-६०’ पथकांच्या युद्धविषयक तंत्रात आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळेच गडचिरोली पोलिसांना गेल्या सहा महिन्यांत २३ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले आहे. गनिमी युद्धात महत्त्वाची ठरणारी सापळा रचण्याची पद्धत नक्षलवाद्यांवर उलटवण्याची कामगिरी या पथकांनी करून दाखवल्याने पोलिसांची जीवितहानी कमी झाली असून, सहा महिन्यांच्या काळातील चकमकीत फक्त एकच जवान शहीद झाला.
गडचिरोली जिल्हय़ातील सेवारीच्या जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार झाल्या. गेल्या जानेवारीपासून या जिल्हय़ात झालेल्या पाच चकमकींमध्ये २३ नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी एप्रिलमध्ये झालेल्या सिंदेसूरच्या चकमकीत सी-६० चा एक जवान शहीद झाला.  गेल्या ३० वर्षांपासून या भागात अशा चकमकी घडत आहेत.
गेल्या वर्षी या जिल्हय़ात एकूण ४२ चकमकींची नोंद घेण्यात आली. या प्रत्येक चकमकीत ‘दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला, पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले, घटनास्थळी रक्त सांडलेले होते,’ अशीच माहिती समोर येत होती. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी प्रत्येक चकमकीत निभ्रेळ यश मिळवण्यासाठी ‘सी-६०’च्या कार्यपद्धतीत बरेच बदल घडवून आणले. आतापर्यंत केवळ नक्षलवाद्यांनी सापळा रचायचा व त्यात अडकलेल्या पोलिसांनी गोळीबार करून स्वत:ची सुटका करून घ्यायची असाच प्रकार नेहमी घडायचा.
या वर्षी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत:च सापळा रचण्याची पद्धत सुरू केली. नक्षलवाद्यांच्या ठावठिकाण्याविषयी एखादी माहिती मिळाली तर सी-६०चे केवळ एक पथक न पाठवता दोन ते तीन पथके वेगवेगळय़ा मार्गानी त्याच ठिकाणी पाठवायची असे धोरण राबवणे सुरू झाले.
 या पथकांमध्ये समन्वय राहावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून चकमकींवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत सुरू करण्यात आली.
शोधमोहीम राबवताना नक्षलवादी नेमका कसा प्रतिकार करतील, कोणत्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील यावर आधीच विचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनेकदा दुर्गम भागात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांची माहिती मिळायची, मात्र जवान पोहचण्याच्या आधीच ते निघून जायचे. ही त्रुटी दूर सारण्यासाठी जवानांना तातडीने पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. जंगलात चकमक सुरू झाल्यानंतर सी-६०चे पथक पळून जाणाऱ्या नक्षलवाद्यांचा पाठलाग सहसा करत नव्हते. त्यात धोका होता. ही उणीव दूर सारण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूला स्वतंत्र पथक नेमण्याची संकल्पना राबवण्यात आली.
 या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे यश असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. चकमकीत ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह पळवून नेण्याचा नक्षलवाद्यांचा आजवरचा शिरस्ता होता. त्यामुळे यश मिळूनही ते सिद्ध करता येत नव्हते. नक्षलवाद्यांना मृतदेह उचलताच येऊ नये यासाठी सी-६०च्या पथकांनी चकमकीच्या दरम्यान नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत तब्बल २३ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात मिळवण्यात यश आले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

सेवारीत काय घडले ?
सेवारीच्या चकमकीत जवानांच्या सापळय़ात एकूण १५ नक्षलवादी अडकले. यात १२ महिला होत्या. पोलिसांचा दबाव बघून या नक्षलवाद्यांनी मेंढेर गावाचा आश्रय घेतला. या गावातून दुसऱ्या बाजूने बाहेर पडणाऱ्या नक्षलवाद्यांना सी-६०च्या दुसऱ्या पथकाने घेरले. त्यात या सहा महिला सापडल्या, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader