गेल्या काही दिवसांपासून कणकवलीत सुरू असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वादाला रविवारी तोंड फुटले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही शिवसैनिक जखमी झाले. या प्रकारामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातच तणावाचे वातावरण असून पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राजकीय वर्चस्वावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे.  या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना वादविवादाचे आव्हान दिले होते. नाईक यांनीही हे आव्हान स्वीकारत कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात वादविवादाची तयारी दर्शवली होती. या वादाचे स्वरुप पाहता पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत उभय पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, रविवारी दुपारी साडेचार वाजता मराठा मंडळाच्या सभागृहात दोन्ही नेते आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह वादविवादासाठी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी वैभव नाईक यांना सभागृहात जाण्यास अटकाव करत त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेले. परंतु शिवसैनिक आक्रमक झाल्याने नाईक यांना सोडण्यात आले. नाईक हे आपल्या कार्यालयात शिरत असतानाच त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. दगडफेकीचे निमित्त होताच पोलिसांनी जमलेल्या शिवसैनिकांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक शिवसैनिक व पत्रकार जखमी झाले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.
काँग्रेसवर टीका
या सर्व प्रकारानंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.  उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या दावणीला येथील काँग्रेस बांधली असून जिल्ह्य़ातील सर्व व्यवहारांत राणेंचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप नाईक यांनी यावेळी केला.