अहिल्यानगर : गोवंशीय जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोस थांबवून व तो टेम्पो पोलीस ठाण्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव वेगातील टेम्पोतून उडी मारून आपला जीव वाचवावा लागला. श्रीरामपूर शहरातील बेलापूर रस्त्यावरील सिद्धिविनायक चौकात ही घटना आज, मंगळवारी घडली.या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिसांनी पिकअप टेम्पो (एमएच १४ व्ही ३११४) चालक रफिक रज्जाक शेख (रा. मानोरी, खिळे वस्ती, राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिस अंमलदार अजिनाथ बाबुराव आंधळे यांनी फिर्याद दिली आहे.

श्रीरामपूरमधील बेलापूर रस्त्याने महात्मा गांधी चौकाकडे एक पांढऱ्या रंगाची पिकअप टेम्पो गोवंशीय जनावरे घेऊन जात असलेली पोलिस अंमलदार अजिनाथ आंधळे व पोलिस अंमलदार अमोल गायकवाड यांना आढळला. त्यांनी टेम्पो सिद्धिविनायक चौकात थांबवला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात पाठीमागील बाजूस लाकडी फळ्या लावलेल्या दिसल्या. आतून जनावरांचा आवाज येत असल्याने पोलीस आंधळे टेम्पोमध्ये बसले व त्यांनी चालकाला वाहन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितले.

पोलिस अंमलदार गायकवाड व पंचांना त्यांनी पाठीमागून येण्यास सांगितले. त्यानंतर टेम्पो चालकाने गाडी पोलीस ठाण्याच्या दिशेने घेतली, परंतु पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर मात्र टेम्पो न थांबवता सुसाट वेगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सय्यदबाबा चौक मार्गे गोंधवणी रस्त्याकडे घेतली. पोलिस अंमलदार आंधळे यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र चालक रफिक शेख याने, आज गाडी पलटी करून टाकतो व तुम्हाला जिवंत ठेवत नाही. मला काही फरक पडत नाही, असे म्हणत सुसाट वेगाने गाडी घेतली.

त्यानंतर गतिरोधक आल्याने गाडीचा वेग मंदावला. ती संधी साधून पोलीस अंमलदार आंधळे यांनी गाडीचा दरवाजा उघडून उडी मारली. त्यानंतरही सदर पिकअप टेम्पो गोंदवणे रस्त्याने भरधाव निघून गेला. यासंदर्भात पोलिस अंमलदार अजिनाथ आंधळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.