गुन्हेगारावर वचक राहण्यासाठी राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना नकार द्यायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. पोलिस दलाने समाजातील चांगल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, मात्र चुकीच्या विशेषत गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याद्वारे जरब निर्माण करण्याची भूमिका चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
तासगाव तालुक्यातील तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्वर्गीय आर.आर. पाटील तत्कालीन गृहमंत्री यांनी रेसकोर्स फंडातून मंजूर केलेल्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कवायत मदानावरील प्रेरणा किल्ल्याचे भूमिपूजन तसेच नक्षत्रवन कुटीचे उद्घाटन आणि तलावाचे मजबूतीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास आमदार सुमनताई पाटील, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, पंचायत समितीच्या सभापती हर्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस जनतेला आपला मित्र वाटावा, मात्र समाज विघातक प्रवृत्तींना पोलिसांचा जरब आणि वचक वाटावा या दृष्टीने या प्रशिक्षण केंद्रातून शिक्षण देण्यावर अधिक भर द्यावा, अशी सूचना करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलिस हा समाजातील महत्त्वाचा घटक असल्याने पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शारीरिक व अन्य प्रशिक्षणाबरोबरच नतिक शिक्षण देण्यावरही या केंद्राने भर द्यावा. समाजातील गुन्हेगारी आणि माफिया राज यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची खबरदारी पोलिस दलाने घ्यावी. राज्य शासन पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी या प्रसंगी दिली.
पालकमंत्री पाटील या वेळी बोलताना म्हणाले, की गुन्हे करणारे राजकीय आश्रय मिळताच आपला दरारा वाढविण्याचा प्रयत्न करतात. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी झाल्याने कायद्याचा धाक वाटत नाही. यामुळेच गुन्हेगारी फोफावते. गुन्हेगारांना सोडण्यासाठी होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी नकार द्यायला पोलीस अधिकाऱ्यांनी शिकले पाहिजे तरच समाजात पोलीस दलाबाबत आदराची भावना निर्माण होईल असे ते म्हणाले.
तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्र हे एक राज्यातील लौकिकपात्र प्रशिक्षण केंद्र असल्याचा गौरव करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन हे केंद्र अधिक बळकट आणि सक्षम बनविण्यास प्राधान्य दिले जाईल. तुरची प्रशिक्षण केंद्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी ९१ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून दिला जाईल. तसेच सौर दिवे प्रकल्पासाठी २० लाखांचा निधी नावीन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संरक्षक िभत उभारण्यासाठी लागणारा निधी अन्य शासन योजनातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राची उभारणी तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून केली असून या केंद्रातून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाहेर पडावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या केंद्रामध्ये तलावाच्या मजबुतीकरण व वृक्षारोपणाच्या हाती घेतलेल्या उपक्रमाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले.
आमदार सुमनताई पाटील या प्रसंगी बोलताना म्हणाल्या, पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देणारी ही एक दर्जेदार संस्था तत्कालील गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकाराने अल्पावधीत उभी राहिली असून या संस्थेतून चांगले प्रशिक्षण घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या केंद्राचा लौकिक वाढवावा.
प्रारंभी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप पाटील-भुजबळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी उपप्राचार्य आर.बी. केंडे यांनी आभार मानले. समारंभास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, अपर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेजाळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, धनपाल खोत, राजाराम गरुड, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा