तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जाणाऱ्या सर्वसामान्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा अथवा त्याची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्याचा अनुभव नवा नाही. परंतु वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या महसूल प्रशासनालाही येथे हा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर दांडगाई करून पळवून नेणाऱ्या मालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी महसूल कर्मचारी दोन दिवसांपासून पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवत असून पोलीस त्यास दाद देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कारवाईस टाळाटाळ करण्यामागे दोन पोलीस ठाण्यांचा हद्दीचा मुद्दा पुढे केला जात असला तरी त्यातून वाळूमाफियांना अभय देण्याचाच प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर शहराजवळ असलेल्या सोयगाव हद्दीत बुधवारी रात्री महसूल खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी पकडला. मात्र चालकाने दांडगाई करत वाळू रस्त्यावर ओतून दिली. ट्रॅक्टर घेऊन त्याने पलायन केले. त्यामुळे तसा पंचनामा करून महसून प्रशासनाने ट्रॅक्टर मालकाविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली. त्यानुसार तहसीलदारांचे पत्र घेऊन संबंधित तलाठी ज्या हद्दीत गुन्हा घडला त्या कॅम्प पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गेले. त्यांना बराच वेळ तेथे थांबवून ठेवण्यात आले. फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही. अखेरीस सायंकाळी हा गुन्हा आमच्या हद्दीत घडला नसल्याचे सांगत तेथील पोलिसांनी त्यांची बोळवण केली. त्यानंतर मग या तलाठय़ाने छावणी पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलिसांनीही आमच्या हद्दीतला हा गुन्हा नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
शिवाय त्यांनी दूरध्वनीवरून हा कॅम्प पोलिसांच्या हद्दीतला प्रकार असल्याची जाणीव तेथील पोलिसांना करून दिली. दोन ठाण्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मग कॅम्प पोलिसांनी संबंधित तलाठय़ास पुन्हा पाचारण केले.
कॅम्प पोलिसांच्या बोलावण्यानुसार तलाठी शुक्रवारी पुन्हा ठाण्यात गेले. मात्र पुन्हा त्यांना तसाच अनुभव आला.
बराच वेळ थांबवून ठेवल्यानंतर तेथील पोलिसांनी त्यांना सायंकाळी येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे तलाठी सायंकाळी पुन्हा एकदा फिर्याद देण्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगण्यात आले. वाळूमाफियाविरोधात फिर्याद देण्यासाठी खुद्द महसूल प्रशासनालाच एवढे अग्निदिव्य करावे लागत असेल तर सामान्य माणसाला आपली कैफियत मांडण्यासाठी कॅम्प ठाण्यात काय दिव्य पार पाडावे लागत असेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच हा वाळूमाफियांना संरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रियादेखील व्यक्त केली जात आहे.

Story img Loader