कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या आवाजाचे नमुने तपासासाठी गुजरातमधील प्रयोगशाळेकडे गुरुवारी पाठविण्यात आले. त्याचबरोबर तपासासाठी पुण्यातील सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱयांनाही बोलावण्यात आले आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले. समीर गायकवाड तपासामध्ये पोलीसांना आवश्यक सहकार्य करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलीसांनी गुरुवारी समीर गायकवाडच्या घरामध्ये शोधाशोध केली. त्यावेळी त्याच्या घरातून एकूण २३ मोबाईल, एक मोठा चाकू आणि सनातन संस्थेचे प्रचार साहित्य मिळाले. याशिवाय, कर्नाटकमध्ये राहणाऱ्या समीरच्या मेहुण्यालाही कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
समीरकडे केलेल्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्याआधारे बुधवारी रात्री एका पुरूषाला आणि ज्योती नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. पानसरे यांच्या खुनाला सात महिने पूर्ण होत असताना बुधवारी पोलिसांनी सांगलीतून समीर विष्णू गायकवाड या तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली आहे. यादरम्यान, समीर आणि त्याच्या कुटुंबाचा सनातन संस्थेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली. १९९८ पासून तो सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्याची पत्नी डॉ. हर्षदा सनातनचे मुख्यालय असलेल्या रामनाथी आश्रमामध्ये सेवेत आहे. गायकवाड परिवार सनातनच्या संबंधातला आहे. पानसरे यांचा खून होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर तो सांगलीमध्ये आला होता. तेव्हापासूनच्या त्याच्या सर्व हालचालींचा पोलिसांकडून मागोवा घेतला जात होता.

Story img Loader