सातारा : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराने वाई येथील एका कंपनीची लुबाडलेली दीड कोटींची रक्कम परत मिळविण्यात सातारा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून या गुन्हेगाराने ही रक्कम लांबवली होती.
तक्रारदार कंपनीने फ्रान्स येथील एका कंपनीला मशीन तयार करून देण्याची मागणी नोंदविली आहे. त्याप्रमाणे वेळोवेळी त्या कंपनीला काही रक्कम देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीला एक कोटी ७० लाख युरो म्हणजे भारतीय बाजार मूल्य किंमत एक कोटी ५३ लाख ५२ हजार ७० रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पाठविले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस फ्रान्स येथील कंपनीशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे समजले. त्यावेळी अज्ञात आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराने संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून ही रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यावर वळविल्याचे लक्षात आले. यावर कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्रबुद्धे यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती,
या गुन्ह्यात आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगार सामील असल्याने तसेच अपहार झालेली रक्कम मोठी असल्याने वाई पोलिसांनी विविध पातळ्यांवर आरोपीचा शोध सुरू केला होता. यात गुन्हेगाराचा माग काढण्यात यश मिळाले. वाईचे परविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर व सायबर टीम यांनी लंडनस्थित एका विदेशी बँकेला नोटीस देऊन गुन्हेगाराने दुसऱ्या खात्यात वळवलेली रक्कम थांबविण्यास सांगितले. यानंतर यातील गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर ही रक्कम संबंधित कंपनीस परत मिळवून देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक शेख यांनी सांगितले.