सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिपाईपदाच्या ३९ जागांसाठी भरती सुरू असून, या जागांसाठी ३ हजार ८३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता बाळगली गेली आहे. तरीही वशिलेबाजीसाठी काही जण घिरटय़ा घालत असल्याची चर्चा आहे. पोलीस भरतीच्या वेळी लोकांची लुबाडणूक होत असते. साहेबांची ओळख सांगून आर्थिक घोळ करणारे कायमच पुढे असतात. सध्या पोलिसांच्या ओळखीचा काही जण गैरफायदा घेत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस भरतीस्थळी उमेदवारांव्यतिरिक्त कोणालही प्रवेश देण्यात येत नाही, असे सांगण्यात येत आहे.
या ३९ जागांत महिलांसाठी राखीव ११ जागा असून, त्यासाठी ५५८ उमेदवारांना बोलाविण्यात आले. पोलीस बंदोबस्तात उपविभागीय पोलीस उपअधीक्षक पद्मजा चव्हाण, चिंचाळकर, निवासी पोलीस अधीक्षक विक्रम जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्ग नगरातील रणरणत्या उन्हात पात्र उमेदवार आपली परीक्षा देत आहेत. आतापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त उमेदवार पात्र ठरले आहेत.