जालना – आजच्या आज वीज जोडणी द्या नाहीतर बघून घेईन, अशी धमकी देऊन ‘महावितरण’चे घनसावंगी येथील कनिष्ठ अभियंता अनिल जंगम यांच्या कार्यालयीन कामात अडथळा आणला, अशा आरोपावरून योगेश प्रकाश बांदल याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
दुसऱ्या एका प्रकरणातही कनिष्ठ अभियंता जंगम यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून रज्जाक सत्तार सय्यद याच्याविरुद्ध घनसावंगी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी ‘महावितरण’ने जालना जिल्ह्यात मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊन यासंदर्भात नंतर पाहणीही करण्यात येत आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी अलिकडेच घनसावंगी येथील कार्यालयास भेट देऊन वीज देयक वसुलीचा आढावा घेतला.
यावेळी थकबाकीमुळे पुरवठा खंडित करण्यात आलेले पाच ग्राहक लघुदाब वाहिनीवर वायरच्या साह्याने आकडा टाकून वीज-चोरी करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी शहागड परिसरातही अशाच प्रकारे पाच ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी असलेल्या ‘महावितरण’च्या अभय योजनेची मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपणार आहे. या ग्राहकांना मूळ देयकाची ३० टक्के रक्कम भरून उर्वरीत ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात आली आहे. जर थकबाकी एकरकमी भरली तर त्यामध्येही सवलत देण्याची योजना आहे. व्याज आणि दंड माफीचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळतो, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.