सोलापूर : शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदार तरुणाला ८० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एका दाम्पत्याच्या विरोधात सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष अशोक पाटील (वय २५, रा. न्यू संतोषनगर, जुळे सोलापूर) या तरुणाने याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.
आपण शेअर बाजारात आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम पाहतो, असे सांगून संबंधित दाम्पत्याने आशिष पाटील यांना भुरळ घातली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास पाच टक्के दराने जास्त परतावा मिळेल आणि झटपट पैसा कमावता येईल, असे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर सुरुवातीला जुळे सोलापुरातील एका हॉटेलात व्यवहार करण्यात आला. नंतर वेळोवेळी रक्कम घेण्यात आली. शेवटी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आढळून येताच पाटील यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.
संबंधित आरोपी दाम्पत्याने पलायन केले असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सोलापूर शहर आणि परिसरात आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास जास्त परतावा मिळतो, असे आमिष दाखवून सुरुवातीला त्यानुसार व्यवहार करायचा आणि विश्वास संपादन केल्यानंतर प्रचंड प्रमाणात पैसा गोळा करून शेवटी फसवणूक करायची, अशी या आर्थिक गुन्ह्यांची पद्धत आहे.