सोलापूर : आघाडीचा विनोदवीर प्रणित मोरे यास छबी काढण्याचा बहाणा करून सोलापुरात एका टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असलेला आणि बॉलीवूडमध्ये नुकताच पदार्पण केलेला वीर पहाडिया याच्यावर विडंबन केल्याचा राग मनात धरून प्रणित मोरे याच्यावर हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सात रस्ता भागातील एका हॉटेलमध्ये विनोदवीर प्रणित मोरे आला होता. तेथे आलेल्या टोळक्याने प्रणित मोरे याची छायाचित्र काढण्याचा बहाणा करून भेट घेतली. परंतु नंतर अचानकपणे या सर्वांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वीर पहाडिया याच्यावर पुन्हा विनोद केला तर आणखी मारहाण करू, अशी धमकीही हल्लेखोरांनी दिली.

यासंदर्भात प्रणित मोरे याने सोलापूर शहर पोलिसांकडे ‘ऑनलाइन’ तक्रार नोंदविली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी प्रणित मोरे यास फिर्याद देण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. परंतु कार्यबाहुल्यामुळे तो येऊ शकला नाही. त्यामुळे अखेर संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाकडून फिर्याद घेण्यात आली. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रणित मोरे यास झालेल्या मारहाणीचा प्रकार कैद झाला होता. त्यातील दहा हल्लेखोरांपैकी आठ जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वीर पहाडिया याने नुकतेच प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत ‘स्काय फोर्स ‘ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा तो नातू, तर उद्योजक संजय पहाडिया आणि स्मृती पहाडिया यांचा मुलगा आहे.दरम्यान, वीर पहाडिया याने घडलेली घटना समजल्यावर आपणास धक्का बसला असून, या मारहाणीच्या घटनेशी आपला संबंध नाही. मात्र या घटनेबद्दल आपण प्रणित मोरे व त्याच्या चाहत्यांची माफी मागतो, असे मत समाज माध्यमावर व्यक्त केले आहे.