सांगली : वन्य प्राण्यांची शिकार करून त्या शिकारीचे छायाचित्रण समाज माध्यमावर प्रसारित केल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाच्यावतीने बुधवारी देण्यात आली. दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथील तरूण उमाजी मलमे यांनी घोरपड, ससा, कोल्हा या वन्य प्राण्यांची पाळीव कुत्र्याच्या मदतीने शिकार केल्याची काही छायाचित्रे आणि चलचित्रे समाज माध्यमावर प्रसारित केली होती.
याची दखल घेत वन विभागाच्या भरारी पथकाने शोध घेतला असता मलमे याने वन्य प्राण्यांची बब्या नावाच्या पाळीव श्वानाकडून शिकार केल्याची आणि त्याची छायाचित्रे व चलचित्रे मोबाईलवरून समाज माध्यमात प्रसारित केल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
सदर गुन्ह्याचा तपास वन परिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर हे उपवन संरक्षक नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. शिकारीसाठी ज्या श्वानाची मदत घेण्यात आली ते श्वानही ताब्यात घेऊन प्राणी देखभाल करणारी संस्थेच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी मानद वन्य जीवरक्षक अजितकुमार पाटील यांनी केली आहे.