सांगली : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सांगली व मिरज शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली असून मिरजेत राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात आली.
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्रीपासून हिंसक घटना घडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे.
मिरज शहर संवेदशनशील म्हणून ओळखले जाते. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच कोल्हापूरहून राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी मिरजेत दाखल करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात राज्य राखीव दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच सराफ कट्टा, गणेश तलाव, गुरुवार पेठ, महात्मा गांधी चौक आदी ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात खुलदाबादमधील औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची आग्रही मागणी सरकारला करण्यात आली आहे.