अलिबाग– नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर चा मोठा साठा पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मुळ सुत्रधाराचा शोध सुरू केला आहे. स्फोटके नेमकी कशासाठी आणण्यात आली होती याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सातारा- पुणे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

पुणे येथून ही स्फोटके बेकायदेशीरपणे पणे आणण्यात आली होती. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना माणगाव तालुक्‍यात स्फोटके येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर यांच्यासह काही निवडक पोलीस कर्मचाऱ्यांचे गस्ती पथक रवाना केले होते. निजामपूर भागात गस्त सुरू असताना एम एच १२ एस एफ ४३२२  या क्रमांकाचे टेप्मो व्हॅन संशयास्पदरीत्या आढळून आला.  चालका जवळ चौकशी केली असता त्यामध्ये सुमारे त्यात तब्बल १ हजार ५००  किलो वजनाचे जिवंत जिलेटीन असलेले ५० बॉक्स  आणि ७० किलो वजनाच्या डेटोनेटर चे ४ बॉक्स असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

जिलेटीन तसेच डेटोनेटर ची वाहतूक पुणे येथून करण्यात आली मात्र त्यासाठी आवश्यक असणारा परवाना अथवा कागदपत्रे नसल्याने पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले. स्फोटके जप्त करून अधिक चौकशी केली असता पाली येथील एका इसमाला जिलेटीन बॉक्स दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंदाजे १४ लाख रूपये इतक्या किंमतीचा माल जप्त केला असून याप्रकरणी विक्रम गोपाळदास जाट,  विठ्ठल तुकाराम राठोड, राजेश सुभेसिंग यादव या तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा >>> सांगली : जय श्रीरामच्या जयघोषात मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा

चार स्वतंत्र पथके – सोमनाथ घार्गे

माणगाव पोलीसांच्या धडक कारवाई नंतर रायगड चे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या कारवाई बाबत पोलीसांचे कौतुक करत अधिक तपासासाठी चार स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली असून मुख्य सुत्रधाराचा शोध घेत असल्याची माहिती दिली. पोलीसांनी पकडलेले जिवंत जिलेटीन हे कोणत्याही सरकारी कामाकरिता आणण्यात आले नसल्याची खात्री पोलीसांनी केली असून विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक करून आणल्याने पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती देखील घार्गे यांनी दिली. माणगाव व अलिबाग येथील पोलीस पथके अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police seized huge stock of explosives in mangaon zws