लक्ष्मणराव केळकर स्मृती व्याख्यानमाला
भारतासह जागतिक पातळीवर गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्याकडून गुन्हे केले जात आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने तपासातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ‘टेक्नोसॅव्ही’ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी संचालक आर. के. राघवन यांनी येथे केले. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत सोमवारी आयोजित चौथ्या लक्ष्मणराव केळकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
कार्यक्रमास व्याख्यानमालेचे संयोजक तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर, राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, प्रबोधिनीचे संचालक डॉ. संजय बर्वे, उपसंचालक डॉ. निखिल गुप्ता आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांतील गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास आर्थिक फसवणूक व सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षणयरीत्या वाढल्याचे लक्षात येईल. सायबर व आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांनी जगातील तपास यंत्रणांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एखाद्याच्या बँक खात्यातून ‘ऑनलाइन’ पैसे काढून घेणे वा तत्सम अनेक प्रकार घडत आहेत. या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा छडा लावताना हे तंत्रज्ञान प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ज्ञात असणे अत्यावश्यक आहे. त्याबद्दल यंत्रणा अनभिज्ञ राहिल्यास तपास पुढे सरकणार नाही. गुन्ह्यांची उकल जलद करण्यात प्रयोगशाळा व जनुकीय तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या तंत्रज्ञानाबद्दल तपास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरेशी माहिती ठेवल्यास तपासकार्य सक्षमपणे होईल. त्याकरिता पोलिसांनी ‘टेक्नोसॅव्ही’ होणे आवश्यक असल्याचे मत राघवन यांनी व्यक्त केले.
माजी पोलीस महासंचालक शिवानंदन यांनीही प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढील दीड दशकात म्हणजे २०३० पर्यंत महाराष्ट्रासह देशात पारंपरिक स्वरूपाचे गुन्हे जवळपास बंद होतील, असे नमूद करत त्यांनी इलेक्ट्रॉनिक व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडतील, याकडे लक्ष वेधले. हे गुन्हे कधी, कुठे घडतील हे सांगता येणे अवघड आहे. याकरिता त्यांनी मध्यंतरी देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या कार्यालयात लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या चर्चेचा संदर्भ दिला. ही बाब लक्षात घेतल्यास पोलीस यंत्रणेला या स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी पुढील काळात किती सतर्क राहून काम करावे लागणार आहे याची जाणीव शिवानंदन यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांनी लक्ष्मणराव केळकर यांच्या कार्याची माहिती दिली.