शहरातील विविध पोलिस चौक्या अद्ययावत करून त्या चोवीस तास सुरू राहतील यासाठी एक उपनिरीक्षक व सहा पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी आज, शनिवारी चितळे रस्त्यावरील पोलिस चौकीच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना दिले.
शहरातील चितळे रस्त्यावरील गेली अनेक वर्षे बंद असलेल्या पोलिस चौकीच्या ठिकाणी दुमजली चौकी उभारली जाणार आहे, त्याचे भूमिपूजन आ. अनिल राठोड व शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राठोड यांनी या चौकीच्या कामासाठी स्थानिक विकासनिधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
जिल्ह्य़ातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे ते वाढवण्यासाठी विविध प्रस्ताव सरकारकडे पाठवले आहेत, जिल्ह्य़ाची लोकसंख्या ४५ लाख व दरवर्षी ७ ते ८ हजार विविध प्रकारचे गुन्हे घडतात, त्या तुलनेत ३० टक्के पोलिस बळ कमी आहे. नगर शहराप्रमाणेच जिल्ह्य़ातील बंद पोलिस चौक्याही पुन्हा कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे अशी सूचना आ. राठोड यांनी केली. शिवाजी शेलार, गणेश आष्टेकर, धनंजय जाधव, उबेद शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, निरीक्षक एल. बी. काळे, सहायक निरीक्षक एस. एन. गोगावले आदी उपस्थित होते. सहायक निरीक्षक नीता उबाळे यांनी सूत्रसंचलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा