सामान्य माणूस कायदा व नियमांचे पालन करतो. त्याला ताठ मानेने पोलीस ठाण्यात येता आले पाहिजे आणि गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पोलीस ठाणे हा गावातील टग्यांचा अड्डा बनू देऊ नका अशी तंबीच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी (ता. संगमनेर ) येथील नव्या पोलीस ठाण्याचे उदघाटन सोमवारी पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
अधिकारी जनतेचे सेवक व जनता मालक आहे. पण घटनेचे हे तत्त्व आज अमलात येताना दिसत नाही. पैसे दिल्याशिवाय व भ्रष्टाचाराशिवाय कामे होत नसतील तर लोकांनी लोकशाहीला का कवटाळायचे असा प्रश्न उपस्थित करून आर. आर. पाटील म्हणाले, आश्वी पोलीस ठाण्याच्या उदघाटनाला नागरिकांची विक्रमी गर्दी आश्चर्यचकित करणारी आहे. या पोलीस ठाण्याच्या मंजुरीसाठी विखे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पोलीस ठाण्यांची संख्या वाढवताना अन्य खात्यांचा खर्च कमी करावा लागतो. शिक्षण व सहकाराच्या बाबतीत हा परिसर अग्रेसर आहे हे भूषणावह आहे. नगर जिल्हा राजकीयदृष्टय़ा जागरूक असला तरी जिल्ह्य़ात राजकीय तंटामुक्ती अत्यंत गरजेची आहे असा टोमणाही पाटील यांनी मारला.
विखे म्हणाले, ब-याच वर्षांनी या भागातील नागरिकांची इच्छा पूर्ण झाली. गृहमंत्री पाटील यांनी हे काम केले ही आनंदाची घटना आहे. या गावांसाठी नवीन पोलीस ठाणे झाल्याने नागरिकांची अडचण दूर झाली आहे. आश्वी महसूल मंडळात यापुढे वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात या मंडळात नायब तहसिलदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा ताण कमी होणार आहे. आर. आर. पाटील ग्रामीण विकासाचे शिल्पकार असून त्यांनी त्यांच्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली असे विखे म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक केले. खासदार वाकचौरे, आमदार तांबे यांची या वेळी भाषणे झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा