शनिशिंगणापूर येथील श्री शनी देवस्थानच्या विश्वस्तांबरोबर होणाऱ्या चर्चेला निघालेल्या पुणे येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सोमवारी नगरमध्येच रोखण्यात आले. येथेच त्यांना आंदोलनाबाबत नोटीस बजावून नंतर पुण्याला रवाना करण्यात आले.
शिंगणापूर येथील शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडने आंदोलन सुरू केले आहे. शिंगणापूर येथे जाऊन आंदोलन करण्याचा त्यांचा मागचा प्रयत्नही अयशस्वी झाला. त्यानंतर संघटनेने सोमवारी शिंगणापूर येथे जाऊन देवस्थानच्या विश्वस्तांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले होते. सोमवारी दुपारी १ वाजता ही चर्चा होणार होती. त्यानुसार संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ कार्यकर्त्यां सोमवारी सकाळी निघाल्या होत्या.
पोलिसांनी पुण्याहून शहरात येण्यापूर्वीच बाह्य़वळण रस्त्यावर केडगाव येथे या कार्यकर्त्यांची वाहने अडवून त्यांना येथेच रोखले. कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कारण सांगून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. येथेच त्यांचे पोलिसांशी बरेच वाद झाले. अखेर औरंगाबाद रस्त्यावरील सरकारी विश्रामगृहावर चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार या सर्वाना तेथे आणण्यात आले. येथे श्रीमती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ वादही झाला. मात्र अखेर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस कल्याण केंद्रातील सभागृहात त्यांची रवानगी केली. येथेच त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.