सातारा : गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. तसेच या मोटारीतून पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त केला आहे.
गोपाळ बदने असे जखमी पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साखरवाडी येथे एक मोटारीतून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी ही मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने मोटार थांबवली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने चालक आणि त्याचा सहकाऱ्याकडे चौकशी करत होते. यावेळी मोटारचालकाने गाडी पुढे पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या दरवाजामध्ये उपनिरीक्षक बदने यांचा हात अडकला होता. चालक त्यांना तसेच पुढे घेऊन गेला. यामुळे उपनिरीक्षक बदने गंभीर जखमी झाले.
तरीही पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर ही मोटार एका खांबाला धडकली. गाडी चालक पळून गेला तर गांजाची वाहतूक करणारा संशयित मोटार धडकल्याने गंभीर जखमी झाला. उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
गांजाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी पकडले आहे. लक्ष्मण रामू जाधव ( पिलीव ता. माळशिरस) असे त्याचे नाव आहे. लक्ष्मण जाधव गंभीर जखमी असल्याने त्यालाही सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर यापूर्वी गांजाच्या वाहतुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. चालक रणजित जाधव फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. फरार चालकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सातारा शाहूपुरी पोलिसांनी मोळाचा ओढा परिसरातून दोघांना अटक केली. रवी रवींद्र जाधव, रेवणसिद्ध भीमाअण्णा पुजारी(भुईंज, ता. वाई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.संशयितांनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना पकडले. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तूल सापडले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पिस्तूल व दुचाकी असा सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलीस कर्मचारी सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.