जालना- आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोबाईल फोनच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या आणि सट्टा घेणारांविरोधात जालना पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत अकरा जणांच्या विरुद्ध कारवाई केली आहे. तर अशा गुन्ह्यांचा इतिहास असणारांकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र लिहून घेतले आहे.
नवीन मोंढ्याकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील एका हॉटेलच्या मागील जागेवर काही जण आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा खेळत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती.
या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, अजितसिंग मलखानसिंग कलाणी, विजय कैलास खरे, अमित नंदलाल दागडिया (सर्व रा. जालना) हे आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन मोबाईल फोनच्या माध्यमातून सट्टा खेळताना आणि खेळविताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन आणि रोख मिळून ५३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हा सट्टा हे चौघे जण लोकेश भगत, हर्षल भगत (जालना) आणि शेख गणी अजिम उर्फ निगरी (देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांना मोबाईल दूरध्वनी आणि व्हॉटस् अप माध्यमातून देत होते, असे यो स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आढळून आहे. त्यामुळे या सर्व सात जणांविरुद्ध चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जालना शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या चार जणांवर कारवाई केली होती. अलीकडेच क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या मागील सात वर्षातील गुन्हयांची माहिती पोलिसांनी संकलित केली होती. त्याआधारे सट्टा घेणाऱ्या १६ जणांच्याविरुद्ध पोलिसांनी बंधपत्र घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.