लोकसत्ता वार्ताहर
परभणी : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांनी केलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईत सुमारे ४४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध वाळू वाहतूक व साठेबाजीच्या विरोधात सातत्याने कारवाया चालू असल्या तरीही पूर्णपणे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा बिमोड करणे अद्यापही शक्य झालेले नाही. वाळूघाटांचा लिलाव झालेला नसताना जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा सुरूच आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या ५३ वाळू गटांची ई-लिलाव प्रक्रिया प्रशासनाने आज जाहीर केली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा अशा गोदाकाठशी संबंधित तालुक्यांमध्ये सातत्याने अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसात कारवायाही सुरू आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी छापेमारी केली. वाळूसाठ्यासह ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीत भारत बेंझ कंपनीचा हायवा क्रमांक – एमएच ४४ -८०९१, स्वराज ८५५ कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच – २२ – एडी – ०४१८, ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच – २१ – ७७९३, टाटा मोटर्स कंपनीचे वाहन क्रमांक नसलेले वाहन, टाटा कंपनीचे टिप्पर क्रमांक एमएच – ०६ – एसी ४९२० अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे, परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे आदींनी आपापल्या कार्यक्षेत्रात केली आहे. जिल्ह्यात पूर्णपणे अवैधरित्या होणारा वाळू उपसा थांबला नाही. अधिकृत घाट नसताना सर्वत्र गोदावरी, दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. तसेच प्रचंड प्रमाणात साठेबाजीही सुरू आहे.
दरम्यान आज गुरुवारी (दि. २४) जिल्हाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील ५३ वाळू गटांची ई लिलाव प्रक्रिया या आर्थिक वर्षासाठी जाहीर केली आहे. त्यानुसार दिनांक ३ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. शनिवार (दि. ३ मे) दुपारी चार वाजेपर्यंत ई लिलावामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी वाळू रेती गटांची पंचवीस टक्के इसारा रक्कम जमा करणे आवश्यक आहे. सोमवारी (दि.५ मे) या दिवशी ई-निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडण्यात येईल तर ८ मे रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत लिलाव ऑनलाइन सुरू राहील. त्यानंतर ई-निविदा उघडण्यात येतील. अर्थात प्रशासनाने आता जरी हे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात अनधिकृतरित्या वाळूचा उपसा सुरूच आहे.