संगमनेर : संगमनेर शहराच्या हद्दीला खेटून असलेल्या गुंजाळवाडी गावातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आज तेथे छापा टाकला. यामध्ये काही प्रिंटर, कागद बनावट, बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव रजनीकांत प्रमोद राहणे ( राहणे मळा, गुंजाळवाडी, संगमनेर) असे आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दिल्ली येथील गुप्तचर विभागाला संगमनेरात बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पुणे गुप्तचर विभागाकडे संबंधित माहिती देत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे येथील गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संगमनेर पोलीस पथकाने संबंधित घरावर आज दुपारी छापा टाकला.
पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे यांचा कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकात समावेश होता. घराची झडती घेतली असता काही प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठीचे कागद आणि काही बनावट नोटा तेथे आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी रजनीकांत राहणे याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.