सातारा : कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे गुरुवारी रात्री पोलिसांच्या एका भरधाव वाहनाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीस चिरडले. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ४५) असे मृत्यू झालेले व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक फौजदारास अटक आली आहे. या घटनेनंतर संतापाचे वातावरण पसरले होते.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार ज्ञानेश्वर राजे मध्यरात्री बंदोबस्त संपवून वाघोली (ता. कोरेगाव) येथे आपल्या घरी वाहनाने जात होते. मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास वाहन चालवताना झोप लागल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रमेश संकपाळ यांच्या घराच्या ओट्यावर गेले. या वेळी घराबाहेर झोपलेले संकपाळ हे वाहनाखाली सापडले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सर्कलवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. ऋतुराज कृष्णा संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक ज्ञानेश्वर बाबूराव राजे या भुईंज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली उदयसिंह जाधव अधिक तपास करत आहेत.