Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची पत्रकार परिषद घेत होते. मात्र, यावेळी मध्येच एसबीच्या (विशेष शाखा) पोलिसांनी घरात येऊन चित्रीकरण केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी असंही म्हटलं की, “विरोधी पक्षांच्या आमदारावर अशा प्रकारे पाळत ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराडवर पाळत ठेवा. वाल्मिक कराडवर पोलिसांनी पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाडांनी काय सवाल केले?

घराचे चित्रीकरण करणाऱ्या विशेष शाखेच्या पोलिसाला जितेंद्र आव्हाड यांनी अनेक सवाल विचारले आहेत. आमदार आव्हाड यांनी म्हटलं की, “तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं घर आहे, माझं खासगी आयुष्य आहे. मग माझ्या घरात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही? हा माझा अधिकार आहे. तुम्ही कसे आलात?”, असे सवाल आव्हाडांनी पोलिसाला केले. या प्रश्नांवर संबंधित पोलिसाने आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याचं म्हटलं.

हेही वाचा : ठाकरे गटाला मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील ‘हा’ नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

यावर पुन्हा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, “वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा टाकणार का? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मग याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर? तुम्ही काय करता हे तुम्हाला समजतंय का? एका विरोधी पक्षाच्या आमदाराच्या घरात जाऊन तुम्ही थेट चित्रीकरण करता? पोलिसांची एवढी हिम्मत? तुमचा येथे चित्रीकरण करण्याचा अधिकार काय? माझं घर आहे मग मला विचारायचं ना? म्हणजे आम्हाला खासगी आयुष्य आहे की नाही?”, असे सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

“हे सर्व धक्कादायक आहे. कारण तो व्यक्ती थेट माझ्या घरात येतो, म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही? एवढीच पाळत ठेवायची होती तर त्या वाल्मिक कराडवर ठेवायची होती ना? पोलिसांना तो लवकर सापडला असता. हे सर्व तुमच्या (माध्यमांच्या) समोर घडलं. हा बनाव वैगेरे नाही. मी त्या पोलिसाला विचारलं तर त्याने मला सांगितलं की मला वरिष्ठांनी सांगितलं”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police watch at jitendra awhad house jitendra awhad alleges that the police filmed the press conference in thane politics gkt