लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अपघातात ठार झालेल्या महिला पोलिसाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून घरी परतत असताना एका पोलिसाचा मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हा पोलीस कर्मचारी कार्यरत होता.

मंगळवारी पहाटे प्रियंका पोटे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे दुचाकीवरून प्रवास करत असताना विट्याजवळ बलवडी फाटा येथे अपघाती निधन झाले. यानंतर तिच्या पार्थिवावर देवराष्ट्रे येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीसाठी तुरची प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचारी संकेत पाटील (वय ३० रा. नागाव ता. तासगाव) हे देवराष्ट्रे येथे गेले होते.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावी दुचाकीवरून परतत असताना तुरची साखर कारखाना ते भिलवडी पाचवा मैल या दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. रात्री दहा वाजता हा अपघात झाला. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader