दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : जिल्ह्यात निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. गाव कारभारी निवडण्यासाठी होत असलेल्या या निवडणुकीपासून आमदार, खासदार अद्याप दूर असले तरी थेट सरपंच निवडीमुळे गावात वर्चस्व कोणाचे, याचा उलगडा होणार असल्याने राजकीय नेत्यांनी सावध भूमिकेत आहेत.
ऐन निवडणुकीत एखाद्या गटाला जवळ केले तर दुसरा गट नाराज होऊन त्याचा फटका पुढील निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने सध्या सावध भूमिकेत असले तरी पडद्याआडच्या हालचाली सुरूच आहेत.
गावचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ग्रामपंचायतीला महत्त्व आहे. यातच वित्त आयोगाकडून थेट निधी ग्रामपंचायतींना प्राप्त होत असल्याने गावचा कारभार करण्यासाठी अनेक कारभारी पुढे येत आहेत. त्यात सरपंच निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
जिल्ह्यात ६६९ ग्रामपंचायती असून यापैकी ४४७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून जिल्ह्यातील निम्म्या गावांत ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून यंदा थेट सरपंच निवड होणार असल्याने गाव पातळीवरही राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेते मंडळी मैदानात उतरत आहेत. अशातच थेट सरपंच निवडीतही वर्चस्व राहावे यासाठी संभाव्य उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. याचीच जोरदार चर्चा गावपातळीवरील कट्टय़ावर रंगत आहे.
सदस्य निवडीबरोबरच थेट सरपंच निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याची तयारी गावपातळीवर सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना या राजकीय पक्षांबरोबरच रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची तयारी सुरू आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू असली तरी यामध्ये राजकीय पक्ष स्वबळावर उतरण्याची शक्यता कमी आहे.
कारण गावपातळीवरील गटातटामध्ये जर प्रत्यक्ष सहभाग घेतला तर याचे परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर वजाबाकीमध्ये होऊ शकतो. यामुळे थेट सहभाग घेण्याऐवजी निवडून आल्यानंतर विजयी उमेदवार आपल्याच पक्षाचा हे सांगण्यासाठी नेत्यामध्ये अहमहमिका लागणार आहे.
पक्षीय पातळीवर निवडणुका होण्याऐवजी गावपातळीवरील आघाडय़ा एकत्र येऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. एकाच राजकीय पक्षात असूनही गटबाजी, भावकी यामुळे सवतासुभा असल्याने पक्षाचे चिन्ह न देता स्थानिक पातळीवरील आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात आहे. या वेळी सरपंच पदाची थेट निवडणूक होत असल्याने कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता थेट सरपंच निवडीत विजयी होतो, यावरून त्या गावचा कल समजून येणार असल्याने राजकीय नेतेही सावध आहेत.