येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात श्री श्री रविशंकर यांचा साक्षात्कार हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपच्या दोन बडय़ा नेत्यांनी एकत्र येत एकोप्याच्या साक्षात्काराचे दर्शन घडविले. या राजकीय साक्षात्कारामुळे भाजपमधील बंडखोरांना दिव्य अनुभूती आल्याची प्रचिती आली. यशस्वी पुरुषामागे पत्नीचे योगदान मोठे असते, हे या आयोजनाचे यजमानपद असलेल्या सुहासिनीताई धोत्रे यांनी सिध्द केले. श्री श्री रविशंकर यांच्या साक्षात्काराचे दृष्यपरिणाम भविष्यात शिष्यांना दिसतील, असे मत येथे अनेकांनी व्यक्त केले.
अकोट येथील दंगल झाल्यानंतर त्या संबंधीच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय धोत्रे, भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर आणि शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे एकत्र आले. या पत्रकार परिषदेनंतर अकोल्यातील राजकीय घडामोडींकडे वेगळ्या अर्थाने सर्वाचे लक्ष केंद्रित झाले. अकोट येथील या पत्रकार परिषदेनंतर गेल्या काही वर्षांपासून वितुष्ट असलेल्या भाऊसाहेब फुंडकर व संजय धोत्रे यांच्या एकोप्याची जोरदार चर्चा अकोल्यातील राजकीय वर्तुळात आहे. या दोन नेत्यांच्या एकोप्यामुळे महाराष्ट्र प्रभारी गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ असलेल्या भाऊसाहेब फुंडकर यांचा संजय धोत्रेंशी घरोबा वाढला, पण त्याचा वाढलेला घरोबा हा बंडखोर भाजप नेत्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागला. साक्षात्कार या कार्यक्रमात भाऊसाहेब फुंडकर यांच्यानजीक संजय धोत्रे बसले होते. त्याच वेळी भाजप बंडखोर व भाऊसाहेब फुंडकर समर्थक गोपी ठाकरे हे दुसऱ्या रांगेत, तर विजय अग्रवाल हे कट्टर समर्थक त्या सभागृहातील शेवटच्या रांगेत बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. धोत्रे व फुंडकर यांच्या एकोप्यामुळे भाजपच्या एका माजी आमदाराच्या पायाखालची वाळू सरकली, पण त्याच वेळी या दोन नेत्यांच्या एकोप्याचा फायदा हा भाजपचा विस्तारात महत्वाचा ठरणार आहे. या दोघांना राजकीय कारणांसाठी एकत्र येण्याचा जणू साक्षात्कार झाल्याचे चित्र या ठिकाणी होते. भविष्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादाला मुठमाती यामुळे देता येईल.
हे सर्व साक्षात्कार या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून अधिक दृढ झाले. येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साक्षात्कार कार्यक्रमाच्या आयोजनात खासदार धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनीताई धोत्रे यांचा विशेष पुढाकार होता. त्यांचा कार्यक्रमातील पुढाकार हा राजकीय एकोपा स्थापित करण्यात महत्वाचा ठरेल. राजकीय भविष्यासाठी तो टिकविण्याचे कसब या दोन वरिष्ठ नेत्यांना दाखवावे लागेल, पण या माध्यमातून यशस्वी पुरुषामागे पत्नीचा मोठा हातभार असतो, हे पुन्हा एकवार सिध्द झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा