संजीव कुळकर्णी
Former CM Ashok Chavan Resigned from Congress : नांदेड : ‘बॉर्न काँग्रेसमन’ ही आपली ओळख सक्रिय राजकारणात आल्यापासून अधिकाधिक ठळक करणारे या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत सोमवारी सकाळीच राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद केली. गेल्या आठवड्यातील नांदेड मुक्कामात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या तसेच इतर सहकार्यांनाही निवडणुकीसाठी सज्ज करणार्या या नेत्याने अचानक पक्षत्याग केल्यानंतर नांदेडसह मराठवाड्यात स्वाभाविक खळबळ उडाली.
काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्या पश्चात मराठवाड्यातील काँग्रेसचा प्रमुख नेता म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव गेल्या एक तपापासून पक्षात स्थापित झाले होते. नांदेड जिल्हा ही त्यांची कर्मभूमी. १९८७ सालच्या पोटनिवडणुकीत नांदेडमधून खासदार झालेल्या चव्हाण यांनी मागील २० वर्षात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करताना जिल्ह्याच्या राजकारणावरच आपला वरचष्मा राखला. २००८-०९ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्व ९ जागांवर काँग्रेस आघाडीचे आमदार निवडून आणले होते.
हेही वाचा… अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली? जुन्या सहकाऱ्याने सांगितलं कारण; या मोठ्या नेत्यावर फोडलं खापर
२०१४ साली मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी लोकसभेमध्ये नांदेडची काँग्रेसची जागा राखली. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले. २०१४-१९ दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही चव्हाण यांनी नांदेडमध्ये काँग्रेसचा गड सुरक्षित राखला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी काँग्रेसचेच वर्चस्व राखले. नांदेड मनपाच्या २०१७ सालच्या निवडणुकीत पक्षाला एकहाती यश मिळवून देताना त्यांनी ८१ पैकी ७३ जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपासह शिवसेनेचा धुव्वा उडाला होता. त्यापूर्वी जिल्हा परिषदेतही त्यांनी काँग्रेसची सत्ता राखली होती.
पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना अशोकराव नांदेडमधून पराभूत झाले होते. त्यांना व त्यांच्या समर्थकांना भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा धक्का दिला; पण या पराभवानंतर स्वतःला आणि काँग्रेसलाही सावरत चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला ९ पैकी ४ जागा मिळवून देत आपले कर्तृत्व नव्याने दाखवून दिले. पुढे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात अशोक चव्हाण यांना महत्त्वाच्या बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळाले. हे सरकार अडीच वर्षे चालले, त्यात आपली छाप पाडतानाच चव्हाण यांनी विरोधात असलेल्या भाजपतील नितीन गडकरी, देवेन्द्र फडणवीस या नेत्यांशी सुसंवाद राखण्याची दक्षता घेतली होती. पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे त्यांना आधीपासून व्यक्तिशः ओळखत होते. मोदी त्यांच्या कार्यशैलीविषयी सर्व काही जाणून होते. दिल्लीतील एका भेटीत मोदी यांना एकदा चव्हाणांकडे पुट्टपार्थीला (सत्य साईबाबांची कार्यभूमी) जाणे-येणे होते की नाही, अशी विचारणा केली होती.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर अशोक चव्हाण हे गेल्या दीड वर्षांपासून आघाडीतील प्रत्येक घडामोडींच्या केंद्रस्थानी होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचा चांगला समन्वय दिसत होता. २०२२ साली खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील आगमन नांदेड जिल्ह्यातून झाले. ही यात्रा नांदेड-हिंगोलीतून पुढे जाईपर्यंत आठवडाभरच्या संपूर्ण नियोजनात चव्हाणांचे अत्यंत मोठे योगदान होेते. काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन अलीकडेच त्यांना अ.भा.काँग्रेसच्या कार्यकारी समितीत सामावून घेतले होते. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्रातल्या आघाडीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीसोबत यावे, असा सूर त्यांनीच लावला होता.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला दोन आठवड्यांपूर्वी नांदेड-लातूरच्या दौर्यावर आले होते. या सबंध दौर्यात चव्हाणांचा कृतिशील सहभाग दिसून आला. काँग्रेस पक्षाने नांदेडसोबतच हिंगोलीची जागा लढवावी यासाठी ते आग्रही होते. हिंगोली मतदारसंघात आपल्याच एका समर्थकाला त्यांनी निवडणूक तयारीला लागण्याची सूचना दिली होती. नांदेडमध्ये त्यांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचीही निवडणूक तयारी दिसून येत होती. पक्षाचे आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामांमध्ये सज्ज करून गेल्या शुक्रवारी नांदेडहून मुंबईला गेलेले चव्हाण पुढील दोन-तीन दिवसांत पक्षाला सोडचिठ्ठी देतील हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण सोमवारची सकाळ त्यांच्या संदर्भातील अत्यंत अनपेक्षित, अत्यंत धक्कादायक राजकीय बातमीनेच उगवली.
हेही वाचा… “अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा करून…” संजय राऊतांची सूचक पोस्ट, म्हणाले…
लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अशोक चव्हाण सहभागी झाले होते. १६ व १७ फेबु्रवारी रोजी लोणावळ्यात होणार्या शिबिरासंबंधी वरील बैठकीत चर्चा झाली. पण नंतरच्या पत्रकार परिषदेत चव्हाण दिसले नाहीत, तरी त्याबद्दल कोणती शंका उपस्थित झाली नाही. मात्र राज्यातील काँग्रेस व मित्रपक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ तीन दिवसांपूर्वी राज्यपालांच्या भेटीसाठी गेले तेव्हा त्यात चव्हाण नव्हते. त्या दिवशी ते मुंबईतही नव्हते, असे आता सांगितले जात असून त्याचदिवशीच्या घडामोडींमध्ये त्यांचा राजकीय निर्णय झाला असावा, असे मानले जात आहे.
अशोक चव्हाण यांना शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा लाभला आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली शंकरराव चव्हाण काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणामध्ये पुढे आले. नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्रिपद असा त्यांचा पाच दशकांचा राजकीय कार्यकाळ राहिला. या सबंध काळात शंकरराव नेहरू-गांधी घराण्यावर निष्ठा बाळगून राहिले. राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांना दोनदा भूषविण्याची संधी मिळाली. प्रदीर्घ राजकीय जीवनात शंकररावांना १९७७-७८ दरम्यान काँग्रेस पक्ष सोडावा लागला. तेव्हा त्यांनी अन्य पक्षात न जाता स्वतःचाच पक्ष स्थापन करून ७८ साली विधानसभेची आपली जागा राखली. पण त्यांचा हा पक्ष अल्पजीवी ठरला. ८० साली ते पुन्हा इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले. स्वतः अशोकरावांनी शंकररावांच्या पक्षाचा अनुभव घेतला नव्हता. १९८५ साली ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले. काँग्रेस पक्षाशी त्यांचा चार दशके संबंध राहिला. वयाच्या पासष्टीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा ‘हात’ सोडून देत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.